येती प्रसवाच्या कळा, लागे आभाळ गळाया
उरी फुटे तिच्या पान्हा,डोळा दिसू लागे कान्हा
या या धरतीचा नूर,आता वाटे हो वेगळा
आभाळाच्या प्रेमापोटी, साऱ्या दिव्याचा सोहळा
उर फाडून देतोया,या ग धरतीचा धनी
प्रीत रुजते तनात,अन खुशी होई मनी
तिच्या आनंदाला आता नाही उरला ग पार
धरा प्रसवे सुखाने, तिचा फुटतो अंकुर
आभाळाच्या मायेला ग,कशाचीही नाही तोड
धरा आभाळा पांघरी,नका येऊ कुणी आड
समाधानाचं सुखाचं, रोप धरतीच्या कुशी
धनी आभाळ तियेचं, दिसे अंगावर खुशी
शिशिराची लाही लाही,धरा मुकाट्याने साही
भेग पडे हृदयात, वाट आभाळाची पाही
असे माहीत हो तिला ईश्वराचे सारे कोडे
व्हाया किंमत सुखाची,आधी वणवा हा झडे
घाव सोसून सोसून, झाल्या अंगावरी भेगा
तरी उभी दिमाखाने, नाही सांगे काही जगा
खूण पक्की ही मनाशी,होईल कृपा ईश्वराची
एक दिन येऊन दया, होईल भेट गगनाशी
तेही आसुसले होते, धरतीच्या प्रेमासाठी
जगी म्हणून पडल्या ,राधा कृष्ण गाठीभेटी
येता सांगावा धरेचा, लागे आभाळ धावाया
तापलेल्या धरतीला, येई वेगे सावराया
जे जे ठेवले जपून,ते ते देई तिचे तिला
अशा दिव्य लेण्यासाठी,धरा सोसते हो कळा
होता मिलन दोघांचे, साऱ्या जगा मिळे सुख
देणं धरा आभाळाचं, पण दोघे राही मूक
खरे सुख समाधान,कुणा देण्यात असते
याच आनंदाने धरा, सारे देऊन टाकते
अन्न धान्याचे अंकुर,देणं धरा आभाळाचं
मोल ठेव रे मानवा,त्यांच्यातील त्या प्रेमाचं
त्यांच्या निस्वार्थी प्रेमाचं !!!
वैशाली ब्रह्मे.
Leave a Reply